तीन आरोपींना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा यशस्वी
जळगाव : जळगावाहून देशी दारूची चंद्रपूरकडे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्हाभरात सापळा रचण्यात आला होता तर संशयास्पद ट्रक रविवारी मध्यरात्री गुजराल पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात 18 लाख रुपये किंमतीची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. जप्त दारूमध्ये टँगो पंच तसेच रॉकेट दारूचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींनी दारूची वाहतूक होत आहे हे लक्षात येऊ नये यासाठी दहा चाकी ट्रकच्या पाठीमागील बाजूस मिठाच्या गोण्या लावल्या होत्या. हे दारू बनावट आहे वा नाही ? हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
तिघा आरोपींना अटक
रविवारी मध्यरात्री गुजराल पंपाजवळ दहा चाकी ट्रक (एम.एच.40 एन.9621) हा आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात दारू आढळली. बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक करणार्या चालक राजेंद्र सुरेश खारकर (28, वांजरी वणी, यवतमाळ), शीतल सुकदेव ब्राह्मणे (38, बल्लारशा, चंद्रपूर) व धनराज उरकुडा चापले (38, रा.वरोरा, चंद्रपूर) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चाचर मोबाईल, पाच हजार रुपये किंमतीच्या मिठाच्या पिशव्या, 18 लाख रुपये किंमतीची दारू तसेच 15 लाख रुपये किंमतीचा दहा चाकी ट्रक जप्त करण्यात आला.
आरोपींचा चोपड्यात मुक्काम
अटकेतील आरोपींनी चोपडा येथे मुक्काम केला असल्याची माहिती आहे तर रात्रीतून आरोपींनी दारू आणून तिची बंदी असलेल्या चंद्रपूरात वाहतूक करण्याचे प्लॅनिंग केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर स्वतः जागून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी ट्रक चोपड्याहून, धरणगाव, एरंडोल व तेथून पुन्हा महामार्गाद्वारे नागपूरकडे नेण्याचे प्लॅनिंग केले मात्र जळगावात आरोपींच्या हातात बेड्या पडल्या. ही दारू आरोपींनी नेमकी कुठून आणली, मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घेत असल्याचे कुराडे यांनी सांगितले.