1800 रुग्णांवर खासगी रुग्णालयांत शस्त्रक्रियांना प्रारंभ

0

नंदूरबार। राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सातपुडा महाआरोग्य शिबिर अभियानातील रुग्णांवर आज (दि.9)पासून धुळे येथे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला. या शस्त्रक्रिया मोहिमेसाठी दि. 3 जूनपर्यंत खास कृती आराखडा तयार केलेला आहे. प्रत्येक हॉस्पिटलसाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे. जवळपास 1804 मोठ्या व लहान शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. लहान मुलांच्या ह्रदयाच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया नाशिक व मुंबई येथे होणार आहेत.

प्रत्येक रुग्णालयात रुग्ण सहाय्यता कक्ष
नंदुरबार शहर व तालुक्यातील दि. 9 मे, शहादा तालुक्यात 11 मे, अक्क्लकुवा, तळेदा तालुक्यातील 13 मे, नवापूर तालुक्यातील 15 आणि धडगाव तालुक्यातील रुग्णांवर दि. 17 मेस धुळ्यातील खासगी डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया केल्या जातील. यात कार्डियाक 44, ऑर्थो 124, न्युरोलॉजी 14, नेफ्रोलॉजी 23, हिअरिंग 126, प्लास्टिक सर्जरी 26, रेडीओलॉजी 56 व पॅडिऍट्रीक सर्जरी 7 अशा एकूण 420 सर्जरी केल्या जातील. लहान मुलांच्या ह्रदयाच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया नाशिक व मुंबई येथे होणार आहेत ,याशिवाय ऑप्थोमोलॉजीच्या 323 शस्त्रक्रिया केल्या जातील.प्रथम टप्प्यातून तालुकास्तरावर नंदुरबार जिल्हा रुग्णालय, शहादा, अक्क्लकुवा व नवापूर येथे मुंबई पुणे येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत 1061 शस्त्रक्रिया केल्या जातील. यात जनरल सर्जरी 825 आहेत. ईएनटी 172 आहेत. यात प्रत्येक रुग्णालयात रुग्ण सहायता कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच विविध समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे. खांडबारा ता. नवापुर जिल्हा नंदुरबार येथील भरत भारवाड या गरीब आदिवासी लठ्ठ रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे डॉ. राज गजभिये यांच्या तज्ञ पथकाने शस्त्रक्रिया केली.