185 मुलांनी सादर केले मनाचे श्‍लोक

0

तळेगाव : कलापिनी, साने गुरुजी कथामाला, दास बोध अभ्यास मंडळ आणि योगीराज फाऊंडेशनच्या वतीने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 185 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी योगीराज फाऊंडेशनचे आशिष पाठक व जिप्सी भटकंतीचे गिर्यारोहक नाद थत्ते, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, अशोक बकरे आणि समर्थ मंडळाचे सुभाष नाईक गुरुजी उपस्थित होते.

विशेष प्रयत्न
उल्लेखनीय बाब अशी की काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरात मनाचे श्‍लोक, शभुंकरोती ऐकावयास मिळत होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पाठांतराची सवय लावणारे हे संस्कार जणू काही विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दशकापर्यंत अनपढ व्यक्तिसही मनाचे श्‍लोक पाठ असायचे. काही वेळ का होईना परंतु मुले शांत चित्ताने हात जोडून मनाचे श्‍लोक म्हणण्यासाठी बसायची. जणू काही पाठांतराची सवयच या बाबी लावत होत्या. आतामात्र घरा-घरातून मनाचे श्‍लोक ऐकू येणे अवघड झाले आहे. या बाबी विलुप्त होऊ नयेत म्हणून कलापिनीतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्था दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करते. हे स्पर्धेचे 23वे वर्ष आहे.

मानसिक ताण कमी होतो
यावेळी बोलताना डॉ परांजपे म्हणाले, मनाचे श्लोकाचे पठण मुलांनी रोज करावे आणि पालकांनी त्यांना श्लोकाचा अर्थ व्यक्तिश: सांगावा कारण मनाच्या श्लोक पठणाने मानसिक ताण कमी होतोच पण आपल्या दैनंदिन वागणुकीवर पण चांगला परिणाम होतो असे सांगितले.

या स्पर्धेसाठी विजया मायभाटे, मोरेश्वर होनप, सुभाष नाईक गुरुजी ,चेतन पंडित, इनामदार, श्रीपाद बुरसे, शांताराम मोडक, हृतिक पाटील, मुक्त भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा बेके, मोहिनी घाबडे आणि सायली रौंधळ यांनी केले व अनघा बुरसे यांनी आभार मानले. स्पर्धेचे हे 23 वे वर्ष होते. सुवर्णरेखा इतराज ( चिंचवड) आणि वंदना मालकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.