1936 च्या अधिवेशन संकल्पचित्राची माजी आमदारांकडून पाहणी

0

शिरीष चौधरींनी केले फैजपूर पालिकेचे कौतुक ; स्मरणात राहणारे संकल्प चित्र

फैजपूर- ग्रामीण भागातील पहिले काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली फैजपूर येथे झाले होते. ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन असल्याने फैजपूरचे नाव सुवर्ण अक्षराने इतिहासाच्या पानावर कोरले गेले त्यामुळे फैजपूर शहराला ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखले जाते. 1936 च्या काँग्रेसच्या अधिवेशनातील संकल्प चित्र असल्याने रविवारी सकाळी 11 वाजता माजी आमदार शिरीष चौधरी यांनी संकल्प चित्राची पाहणी करून आनंद व्यक्त केला.

स्मरणात राहणार संकल्पचित्र -माजी आमदार चौधरी
ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन हे याच पावन भूमीत झाले असल्याने त्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून पालिकेने हे अतिशय सुंदर असे संकल्प चित्र उभारले आहे यामुळे या आठवणी ताज्या झाल्या असून खरोखर प्रत्येक नागरीकांच्या स्मरणात राहणारे संकल्प चित्र आहे, असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. यावेळी भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, केतन किरंगे, शेख अब्दुल्ला, शेख रियाज, मुख्याध्यापक आगळे, वसीम तडवी, शरीफ मलिक, पर्यवेक्षक संजय सराफ, ठेकेदार संजय वाणी यांची उपस्थिती होती.

शहरवासीयांच्या स्मरणात राहणारे संकल्प चित्र
1936 साली स्वातंत्र लढ्यासाठी ग्रामीण भागात काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले होते या पावन भूमीत थोर मंडळींचे पदस्पर्श झाले, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू आणि ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक धनाजी नाना चौधरी यांचे संकल्प चित्र पालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून 75 लाखांच्या निधीतून पूर्ण होत आहे.

तीन वेळा निघाली वर्क ऑडर
शहरात 1936 च्या अधिवेशनातील संकल्प चित्र शहरात उभे रहावे म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष यांनी त्यांच्या काळात मंजुरी मिळवून आणली होती परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि या संकल्प चित्राचे काम बंद पडले. त्यानंतर तीन वेळा वर्क ऑडर काढण्यात आली व नंतर संजय वाणी यांना मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी त्यांना काम दिले. आज संकल्प चित्राचे काम पूर्णत्वास आले आहे.

फैजपूर शहराच्या सौंदर्यात भर
छत्री चौकात ग्रामीण अधिवेशनाची ओळख निर्माण व्हावी आणि नवीन पिढीला ग्रामीण अधिवेशन कसे होते त्यात कोण कोणाची उपास्थिती होती हा इतिहास लक्षात रहावा हा उद्देश डोळ्यासमार ठेवून अधिवेशनातील संकल्प चित्र उभारले जात आहे. यामुळे फैजपूर शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे हे संकल्प चित्र महाराष्ट्रात पहिले असल्याचे औरंगाबाद येथून आलेल्या शिल्पकारांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्यधिकारी, नगरसेवक यांचे सहकार्य लाभत आहे.