194 युनिट रक्तदान करून केली दिवाळी साजरी

0

संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

रावेत- संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन झोन, पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत शाखा वाल्हेकरवाडी यांच्यावतीने मागील रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 194 युनिट रक्त संकलित करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य वाय.सी.एम.रक्तपेढी आणि ससून रक्तपेढी यांनी केले. कैलास आहेर यांनी शिबिरासाठी विनामूल्य कार्यालय देऊन महत्वपूर्ण योगदान दिले. शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे रामचंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसरीचे संयोजक अंगद जाधव, पिंपरी संचालक प्रल्हाद गौंड, थेरगाव प्रबंधक चंद्रकांत चव्हाण, सेवादल, फाऊंडेशनचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, उप महापौर सचिन चिंचवडे, सी.इ.ओ.सतीशकुमार खडके, नगरसेवक नामदेव ढाके, राहुल कलाटे, नगरसेविका करुणा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, बाळासाहेब वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी सत्तारूढ पक्षनेते शामराव वाल्हेकर आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

परिसरात केली जनजागृती
या शिबिराची सुरवात सकाळी 7 वाजता जनजागृती पदयात्रेने करण्यात आली. या पदयात्रेची सुरवात आहेर गार्डन मंगल ार्यालयापासून करण्यात आली. पुढे चिंतामणी चौक, सायली कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, महानगर पालिका दवाखाना, लक्ष्मी नगर इत्यादी ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात आली. आपण रक्त निर्माण करू शकत नाही ते रक्तदानाच्या माध्यमातूनच मिळवू शकतो. मोठ्या सर्जरीच्यावेळी, अपघातग्रस्त व्यक्ती, गरोदरपणात आई व बाळासाठी अशा अनेक परिस्थितीच्या वेळी रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासते. ही पोकळी भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. रक्तदान केल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. एकदा दिलेले रक्त तीन ते चार रुग्णांना दिले जाते. त्यामुळे एकाच वेळी चारजणांचे प्राण वाचवल्याचे विलक्षण समाधान मिळते असे अनेक फायदे रक्तदात्याला होत असतात.

13 ठिकाणी झाली शिबिरे
संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदानाची सुरवात 1986 पासून झाली. एप्रिल 2018 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 13 रक्तदान शिबिरे झाली. यामध्ये 4415 युनिट रक्तदान करण्यात आले आहे. मार्च 2018 पर्यंत आणखी 9 रक्तदान शिबिरे विविध ठिकाणी होणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली. रक्दानासाठी सर्वस्थरातून उत्तम प्रतिसाद मिळाला सर्व रक्तदाते, सेवादल, स्वैमसेवक साधसंगत यांच्या अलौकिक योगदानाबद्दल रामचंद्र लाड यांनी सर्वांचे आभार मानले. शिबिराचे सूत्रसंचालन सुशांत चाळके यांनी केले.