४९ हजार विद्यार्थी आज देणार बारावीची परीक्षा

0

इंग्रजी विषयाचा पेपर; 71 केंद्रावर होणार परीक्षा


जळगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. जिल्हाभरातील 49 हजार 403 विद्यार्थी 71 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात बारावीचे 19 उपद्रवी केंद्र निश्चित केले असून त्या केंद्रांवर बैठे पथकाद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यात विविध प्रमुख व उपकेंद्रावरील बैठक व्यवस्था जाहीर झाली. आज मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होईल. परीक्षेसाठी आवश्यक सर्व तयारी शिक्षण विभागाने केली असून गैरप्रकार टाळण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त प्रशासन सतर्क

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने बारावीच्या परीक्षेसाठी 71 केंद्र ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून परीक्षा केंद्रांची तयारी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर उपद्रवी केंद्रांवर जिल्ह्यातील सात भरारी पथकांसह तालुकास्तरीय पथकांचीही नजर असणार आहे. दरम्यान, सोमवारी परीक्षेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्रा ठिकाणी आपला बैठक क्रमांक शोधण्यासाठी गर्दी केलेली होती.

या केंद्रांवर विशेष नजर

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होणे, टवाळखोरांकडून कॉपी पुरविणे, गोंधळ होणे असे आदी प्रकार घडणाजया उपद्रवी केद्रांवर शिक्षण विभागाच्या भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे़ जळगाव जिल्ह्यात बारावीची 13 उपद्रवी केंद्र आहे़ त्यामध्ये जळगावातील एस़एस़पाटील कला भाऊ साहेब टी़टी़ साळुंखे वाणिज्य व जी़आऱपंडीत विज्ञान महाविद्यालय, सिध्दीविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचोलीतील सार्वजनिक माध्यमिक विद्यालय, पोचारामधील शेठ एम़एमक़ला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कासमपुरामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील बोलमोहन उच्च माध्यमिक विद्यालय, पारोळामधील किसान कनिष्ठ महाविद्यालय, भडगावातील सुमनताई गिरधर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, भुसावळ येथील डी़एल़हिंदी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वरणागावातील महात्मा गांधी विद्यालय, चाळीसगावातील जयहिंद माध्यमिक विद्यालय, यावलमधील डॉ़ झाकीर हुसेन उर्दु कॉलेज व सावद्यातील आनंदीबाई हायस्कूल व नाग़ो़ पाटील कनिष्ठ महाविद्यालय या 13 उपद्रवी समावेश आहे़

पर्यवेक्षकावरही कारवाई

एकाच वर्गात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़ दुसरीकडे परीक्षा केंद्र परीसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.