नेरुळ : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’करण्यासाठी जनजागृतीप्रमाणेच प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणार्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्यांवर धडक कारवाईच्या मोहीमा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विभाग कार्यालयांमार्फत हाती घेण्यात येत आहेत.
त्यानुसार आज सकाळी ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केट येथे राहुल गुप्ता यांच्या गाळा क्र. डी-647 मधून त्याचप्रमाणे कमलेश गुप्ता यांच्या गाळा क्र. 452 येथून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या एकूण 1955 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे रू. 10 हजार रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचारी यांनी ही धडक कारवाई करून हा तब्बल 1956 किलोचा मोठ्या प्रमाणावरील प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
प्लास्टिकचा वापर टाळा
यापुढील काळात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम संपूर्ण नवी मुंबई शहरात मोठ्या स्वरुपात राबविण्यात येत असून प्लास्टिकचा साठा व विक्री करणार्या व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे तसेच नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी, कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.