1965 युद्धाचे हिरो एअर मार्शल अर्जुन सिंग अत्यवस्थ

0

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी घेतली भेट

नवी दिल्ली : पाकिस्तानला धूळ चारणार्‍या 1965च्या युद्धात हिरो ठरलेले देशातील एकमेव मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जुन सिंग (वय 98) यांची प्रकृती वयोमानामुळे अत्यवस्थ झाली आहे. त्यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे तातडीने त्यांना दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मार्शल अर्जुन सिंग हे वयाच्या 44 व्या वायूदलप्रमुख बनले होते. पाकिस्तानविरुद्धच्या 1965च्या युद्धात वायूदलाचे नेतृत्व त्यांच्या हातात होते. भारतीय लष्करात पाच स्टार प्राप्त करण्याचा मान केवळ तीन अधिकार्‍यांनाच मिळालेला आहे. त्यातील अर्जुन सिंग हे एक नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, आपण त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला आहे. आम्ही सर्वच त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टरही पूर्ण प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मोदींनी मीडियाशी बोलताना दिली.

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत
देशाच्या तीनही सैन्यदलात आतापर्यंत केवळ एअर मार्शल अर्जुन सिंग, फील्ड मार्शल मानिक शॉ आणि के. एम. करिअप्पा यांनाच पाच स्टार मिळालेले आहेत. मार्शल हे कधीच सेवानिवृत्त होत नसतात. अर्जुन सिंग हे 2002 मध्ये पाच स्टारच्या रँकसाठी प्रमोट झालेत. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला. त्यांच्या अतुलनीय शौर्य कार्याबद्दल त्यांचा भारतीय लष्करात सर्वोच्च सन्मान झाला. सरकारनेही त्यांचा पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मान केला. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले होते. तेथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले असता, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक नेते पोहोचले होते. यावेळी व्हिल चेअरवर आलेल्या अर्जुन सिंग यांनी थरथरत्या हातांनी कलाम यांना सॅल्युट ठोकला होता. त्यासाठी ते चालत कलामांच्या पार्थिवाजवळ गेले होते.