भाजपने राजकारण करू नये, शीखविरोधी दंगलीशी कॉंग्रेसचे संबंध नाही-अमरिंदर सिंग

0

चंदीगड- १९८४ मधील शीखदंगली प्रकरणी दिल्लीतील उच्च न्यायालयाने तब्बल ३४ वर्षानंतर काँग्रेस नेता सज्जन कुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वागत केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर घडलेली ही अत्यंत हिंसक जातीयवादी घटना होती. सज्जन कुमार यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे पीडितांना अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या घटनेशी काँग्रेसचा तसेच गांधी कुटुंबीयांचा काही संबंध नाही, भाजपा याचे नाहक राजकारण करत असल्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत ६ व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सज्जन कुमारला दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांपुढे शरण येण्याची मुदत देण्यात आली आहे. सज्जन कुमारने दिल्ली महानगरपालिकेपासून राजकारणाला सुरुवात केली होती. तो तीन वेळा काँग्रेसचा खासदार होता. सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.