1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण ;आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंटचा मृत्यू

0

पुणे । 1993 साली घडलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट याचा बुधवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ताहीरवर मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप होता.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने ताहीर मर्चंट आणि फिरोज राशिद खानला फाशीची शिक्षा सुनावली होती. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी काही लोकांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यांची पाकिस्तानातून ने-आण करण्याची जबाबदारी ताहीरवर होती. या आरोपींचे पासपोर्ट तयार करण्याचे काम ताहीरच करत होता. दुबईत बसून त्याने मुंबई बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचले होते. शिवाय शस्त्र खरेदी करण्यासाठी पैसा जमविण्याचे कामही तो करत असल्याचा ठपका न्यायालयाने त्याच्यावर ठेवला होता. त्याच्यावरील हे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

गेल्यावर्षी शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.