दुहेरी हत्याकांडाप्रकरणी एकाला अटक

0

मुंबई :- ठाणे पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. वीस वर्षांपूर्वीच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी दाऊदचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा तारिक अब्दुल करीम परवीन (५१) याला देखील ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

मुंब्रात १९९८ मध्ये किस्मत कॉलनी परिसरात अब्दुला पटेल शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोहमद इब्राहिम बांगडीवाला आणि त्याचा मित्र परवेज अन्सारी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात रोशनआरा खान नावाची मुलगीही जखमी झाली होती. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खूनप्रकरणातील ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. मात्र, या गुन्ह्यामध्ये तारिक परवीन हा फरारी होता

याबाबत माहिती मिळताच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुंब्य्रातील दुहेरी खुनाची कबुली दिल्यामुळे खंडणीविरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुंब्रा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.