आता गृहपाठ करण्याची चिंता नाही

0

मद्रास-गृहपाठ म्हटल की शाळेतील विद्यार्थांसाठी मोठे संकट. काही ना काही कारणाने गृहपाठ चुकविण्यासाठी मुल नवनवीन क्लुप्त्या शोधतात. दरम्यान गृहपाठच्या ओझ्याखाली दबलेल्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा देणारा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे.पहिली आणि दुसरीच्या मुलांना गृहपाठ देऊ नये. तसेच शाळेत त्यांच्यावर गणित आणि भाषा याशिवाय अन्य कोणत्याही विषयांची सक्ती करु नये, असे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले आहेत.

एनसीईआरटीच्या पुस्तकांची सक्ती
मद्रास हायकोर्टात एम. पुरुषोत्तम यांनी सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सक्ती करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केले होती. या याचिकेवर न्या. एन. किरुबाकरन यांनी निर्णय दिला. हायकोर्टाने एनसीईआरटीच्या पुस्तकांची सक्ती केली आहे. पण त्यासोबत अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर हायकोर्टाने निर्णय दिला.

दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के
लहान मुलं ही काही वेटलिफ्टर किंवा ओझं वाहून नेणारे कंटेनर्स नाहीत. महाराष्ट्र आणि तेलंगण सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कायदा केला असून त्याच धर्तीवर केंद्र सरकारने कायदा करावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के इतकेच असावे. त्यापेक्षा जास्त वजन नसावे, असे हायकोर्टाने निकालात म्हटले आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांना पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये, यासंदर्भात परिपत्रक जारी करावे. शाळा कोणत्याही राज्य शिक्षण मंडळ किंवा सीबीएसई किंवा अन्य कोणत्याही बोर्डाशी संलग्न असल्या तरी सर्वांना हा नियम लागू करावा. तसेच पहिली व दुसरीच्या मुलांना भाषा व गणित विषय वगळता अन्य कोणत्याही विषयांची सक्ती करु नये, असे हायकोर्टाने म्हटले आहे. याशिवाय तिसरी आणि चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना फक्त पर्यावरण हा अतिरिक्त विषय असावा, असेही हायकोर्टाने सांगितले.