2 लाख प्रवाशांची ‘कॅशलेस’ला पसंती

0

पुणे । पुणे रेल्वे मंडळ रोकडरहित व्यवहारांना पूर्वीपासून चालना देत आहे. मागील वर्षी झालेल्या नोटाबंदीने रोकडरहित व्यवहारांना आणखी गती मिळाली असून डिसेंबर 2016 ते ऑक्टोबर 2017 दरम्यान दोन लाखपेक्षा अधिक प्रवाशांनी पीओएस मशीनचा वापर केला आहे. यातून पुणे रेल्वे प्रशासनाला 11 कोटी 65 लाखांचा महसूल प्राप्त झाला.

पुणे रेल्वे मंडळाने वारंवार रोकडरहित व्यवहारांबाबत विविध मोहीम राबविल्या आहेत. नोटाबंदी होण्यापूर्वीपासून पुणे रेल्वे प्रशासन ऑनलाईन व्यवहारांना चालना देत आहे. डिसेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 दरम्यान 15 हजार 730 प्रवाशांनी पीओएस मशीनद्वारे तिकिटे खरेदी केली. यातून जवळपास एक कोटी रुपये इतका महसूल जमा झाला. मागील वर्षी 8 नोव्हेंबर, 2016 रोजी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर डिसेंबर 2016 ते ऑक्टोबर 217 दरम्यान पुणे रेल्वे मंडळाने आपल्या कार्यकक्षेत एकूण 47 रेल्वे स्थानकांवर 131 पीओएस मशीन लावल्या. याचा उपयोग दोन लाखपेक्षा अधिक प्रवाशांनी घेतला. यातून रेल्वेला 11 कोटी 65 लाख रुपये महसूल प्राप्त झाला. याबरोबरच पार्सल बुकिंगच्या 11,300 पेक्षा अधिक व्यवहारांमध्ये सात कोटी 76 लाख रुपये मिळाले आहेत. अशा प्रकारे पुणे मंडळ रेल्वे प्रशासनाला कॅशलेस व्यवहारातून एकूण 19 कोटी 41 लाख रुपये एवढा महसूल प्राप्त झाला आहे. पुणे रेल्वे मंडळाच्या 45 रेल्वे स्थानकांवर शंभर टक्के कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट, पार्सल, पार्किंग, हॉटेल, पे अँड यूज शौचालय, बुक स्टॉल अशा सर्व ठिकाणी रोकडरहित व्यवहार करता येणार आहे.