कोईंबतूर : दक्षिणेतील चाहत्यांसाठी रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे त्यांच्यासाठी तो दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर त्यांच्या मोठ मोठ्या प्रतिमा उभारणं, त्यावर दुग्धाभिषेक करणं, पूजा बांधणं हे प्रकार इथे सर्रास पाहायला मिळतात. इतकंच नाही तर अनेक ऑफिसला सुट्टीही दिली जाते.
कोईंबतूरमधल्या एका कंपनीनंदेखील 2.0 च्या निमित्तानं कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहावा यासाठी ही सुट्टी देण्यात आली. पद्मविभूषण सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसाची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असं कंपनीनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कंपनीनं चित्रपटाची तिकिटंही दिली आहेत.