नवी दिल्ली-सलमान खानला मारणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रवीण तोगडिया यांचे सहकारी असलेल्या गोविंद पराशर यांनी हे आवाहन केले आहे. तोगडियांनी हिंदू ही ‘आगे’ या संस्थेची स्थापना केली असून पराशर आग्रा शाखेचे प्रमुख आहेत. या वर्षी १४ एप्रिल रोजी तोगडियांनी विहिंप सोडली.
लव्हरात्री चित्रपटामुळे रोष
सलमान खान निर्माता असलेल्या नव्या सिनेमाचे नाव लव्हरात्री असून तो नवरात्रीच्या सुमारास प्रसारीत होणार आहे. नवरात्री हा हिंदूंचा सण असून त्यावेळी लव्हरात्री प्रसारित करणे हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार असल्याचा दावा पराशरनी केला आहे. हा चित्रपट सलमान खान याची कंपनी बनवत आहे. हिंदू ही आगेच्या सदस्यांनी या चित्रपटाची पोस्टर्स एका चित्रपटगृहाबाहेर जाळली. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झळकणाऱ्या या चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा झळकणार आहे.
धार्मिक भावना दुखवल्या
नवरात्री हा धार्मिक सण असून मुद्दामून या सुमारास लव्हरात्री नावाचा सिनेमा बनवून लाखो हिंदूंच्या भावना सलमान दुखावत असल्याचा आरोप पराशरनी केला आहे. सलमानच्या या चित्रपटाला बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर या चित्रपटावर बंदी घातली नाही तर आम्ही सर्व ताकदीनं तो बंद करण्यासाठी विरोध करू असंही या संस्थेने म्हटलं आहे. या पुढे जात हिंदू ही आगे या संस्थेचा आग्रा शहर शाखेचा प्रमुख या नात्यानं आपण सलमान खानला सगळ्यांच्या देखत जो मारेल त्याला दोन लाखांचे बक्षीसही आपण जाहीर करत असल्याचे पराशर यांनी सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही एस कोकजे यांनी राघव रेड्डी या तोगडिया यांच्या पाठिराख्याचा पराभव करत विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगितला आणि तोगडियांनी विहिंपचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानच्या पाठिराख्यांना सहाय्य करत असल्याचा आरोपही तोगडियांनी केला होता.