नगर जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या; गुन्हा दाखल

0

जामखेड :- अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवर येवून केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय ३०) आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात (२३) यांचा मृत्यू झाला. योगेशला चार, तर राकेशला दोन गोळ्या लागल्या होत्या. ही घटना बीड रस्त्यावरील वामन ट्रेडर्ससमोर घडली.

बोर्ड लावण्यावरून वाद

अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हत्या प्रकरण पाच जणांवर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची मृताच्या भावाची पोलिसात तक्रार करतांना सांगितले आहे.

महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता ही घटना नव्याने घडल्याने नगर जिल्ह्यात भीती दायक वातावरण निर्माण झाले आहे. या दुहेरी हत्याकांडाने जिल्हा पुन्हा हादरला आहे. नगरमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

योगेश राळेभात व राकेश राळेभात हे सायंकाळी मित्रांसह बाजार समिती परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. त्यावेळेस दोन दुचाकीवरून आलेल्या आणि तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर योगेशचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या राकेशचा नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हेल्लेखोर घटनास्थळावरून लगेच पसार झाले. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे योगेश व राकेश उपचाराअभावी अर्धा तास तसेच पडून होते.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव उपस्थित होता. ते जोरदार घोषणाबाजी करत होते. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेतला.