20 गावे टंचाईच्या डार्क झोनमध्ये

0

रावेर तालुक्यात कोट्यवधींच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामानंतरही जलपातळी झपाट्याने खालावली ; उपाययोजनांचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परीषदेकडे मंजुरीसाठी सादर

रावेर- पाणीदार रावेर तालुक्यात तेरा कोटी रुपये खर्चाच्या जलयुक्त शिवार योजनेची कामे होवूनही आदिवासी भागातील आठ तर इतर 12 गावे पुढील महिनाभरात संभाव्य पाणीटंचाईच्या डेंजर झोनमध्ये आहेत. पुढील महिनाभरात या 20 गावांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार असून या गावांना ट्यूबवेल, विहिर अधिग्रहण, विंधन विहिरी मंजूर करण्यासाठी पंचायत समितीकडून जिल्हा परीषदेकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.

जलपातळीत प्रचंड घट
गत वर्ष सोडले तर तालुक्यात सरासरी पाऊस होऊन सुध्दा जलयुक्त शिवार योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याच्या पातळीत प्रचंड घट होत आहे. पुढील महिनाभरात 20 व त्यापेक्षा अधिक गावे पाणीटंचाईच्या डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता गृहित धरून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समितीतर्फे आधीच खबरदारी घेत 20 गावांना ट्यूबवेल, विंधन विहिरी, विहिर अधिगृहित करण्यासाठी जिल्हा परीषद प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे.

या गावांना संभाव्य पाणीटंचाईचे चटके
रावेर तालुक्यात सुमारे 13 कोटी रुपये खर्चाची जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली आहेत शिवाय कामे झालेल्या आदिवासी भागातील पिंपरकुंड-निमड्या, पाडळे बु.॥, सायबुपाड्या-निमड्या, जुनोने, विश्राम-जीन्सी, मोरव्हाल, जानोरी-तांडावस्ती या गावांसह खिरोदा प्र.या, थेरोळे, थोरगव्हाण, पातोंडी, चोरवड, निंबोल, रमजीपूर, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, भातखंडे आदी गावांना संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समितीकडून जिल्हा परीषदेकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.