मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जात असून या स्मारकाचे भूमिपूजन डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 2 महिन्यांपूर्वी स्मारकाच्या बांधकामाला देखील सुरूवात करण्यात आली आहे. असे असताना आता पुन्हा एकदा शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिवस्मारक समितीने घातला आहे.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भूमिपूजनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुमारे 3600 कोटी रुपये खर्च करत शिवस्मारकाची उभारणी केली जात असून हे काम एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. 2016 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला 2 महिन्यांपूर्वीच सुरूवात झाली आहे. भराव टाकण्याचे काम सुरू करण्याआधी शिवस्मारक समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एल अॅण्ड टीने 2 महिन्यांपूर्वी पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात अपघातात शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता सिद्धेश पवार याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येणे बाकी आहे.