शहर वाहतूक, आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम
जळगाव : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसविणे, कागदपत्रांची अपूर्णता अशा वाहनांविरोधात शनिवारी उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच वाहतुक पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून एक लक्झरीसह वीस प्रवासी वाहने जप्त केली. ममुराबाद रस्ता, शिरसोली मार्ग, ईच्छादेवी चौक याठिकाणी शनिवारी दुपारी राबविण्यात आलेल्या अचानकच्या मोहिमेमुळे वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती.
रस्ता सुरक्षा सप्ताहच्या अनुषंगाने आज संयुक्त हाती घेण्यात आली. अवैध वाहतूक , विना परिमिट वाहन चालविणे, कागदपत्रांची अपूर्णता तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणार्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग आव्हाड, मोटार वाहन निरीक्षक दीपक साळुंखे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, हायवे वाहतुकीचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक दिलीप पाटील तसेच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी महेश अहिरराव, योगेश पाटील, सचिन पारधी, परमेश्वर जाधव, किरण मराठे, मोतीसिंग मज्जा, हायवे कर्मचारी चंद्रकांत सोनवणे, गोविंद साबळे, हेमंत माळी, युसूफ लालन, प्रदीप नन्नवरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ज्या वाहनांमध्ये अपुर्णता दिसून आली अशाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.