20 मे रोजी महापालिकेच्या अ‍ॅपचे लोकार्पण

0

जळगाव । शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सेवांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी प्रशासनातर्फे कॉल सेंटर व ‘स्मार्ट जळगाव’ अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोघां सुविधांचे शनिवार 20 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी किशोर राजेनिबांळकर यांच्याहस्ते शुभारंभ होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. यात तक्रारींचा निपटारा करणार्‍या पहिल्या तीन अधिकार्‍यांना बक्षीस, तर शेवटच्या तिघांवर कारवाई केली जाणार आहेे.

असे आहे ’स्मार्ट जळगाव’ अ‍ॅप
गुगल प्ले स्टोअरमधून ते डाऊनलोड करून घेता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या फोटो तसेच लेखी स्वरूपात तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रारीचा निपटारा झाल्यास तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचेल. तक्रारींचा निपटारा झाल्याचे नोंदवल्यावर संबंधित तक्रारदाराला मेसेज जाणार आहे. जर तक्रार कायम असेल, तर ती तक्रार पुन्हा उघडता येणार आहे.

कॉल सेंटरमध्ये 90 प्रकारच्या तक्रारींचा निपटारा
नागरिकांना कॉल सेंटरच्या 7900051000 या क्रमांकावर संपर्क साधून 90 प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत. तसेच पालिकेकडून घ्यायच्या परवानग्या, स्वच्छता, अतिक्रमण, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या तक्रारी करता येणार आहेत. कॉल सेंटरची सूत्रे नाशकातून हलवली जाणार असून तक्रारींच्या टक्केवारीचा चार्ट दर महिन्याला काढला जाणार आहे.