माँट्रियल । अवघे 20 वर्षे वय असलेल्या जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव्हने 36 वर्षीय दिग्गज टेनिसपटू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला हरवत रॉजर्स कप टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे अजिंक्यपद मिळवले. चौथे मानांकन मिळालेल्या झ्वेरेव्हने दुसर्या मानांकित फेडररला 6-3, 6-4 असे हरवून विजेतेपदावर नाव कोरले. झ्वेरेव्हचे हे यावर्षातले पाचवे विजेतेपद आहे. या सामन्यातील विजयासह झ्वेरेव्हने सलग 10 वा सामना जिंकत सलग 16 सामने जिंकलेल्या फेडररची विजयी घौडदौड संपुष्टात आणली.
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या झ्वेरेव्हचा फेडररविरुद्धच्या कामगिरीचा आलेख 2-4 असा झाला आहे. याशिवाय आता तो 2007 मध्ये ही स्पर्धा जिंकणार्या नोवाक जोकोविचनंतर युवा विजेता ठरला आहे. फेडररचा यावर्षातील 38 सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे. पुढील आठवड्यात खेळली जाणारी सिनसिनाटी ओपन स्पर्धा जिंकल्यावर फेडरर पुन्हा अव्वल स्थान मिळवू शकतो. महिलांच्या एकेरीच्या लढतीत युक्रेनची एलिना स्वितोलीना विजयी झाली. अंतिम लढतीत तिने डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीचा 6-4, 6-0 असा पराभव केला. स्वितोलानचे हे या वर्षातले सहावे विजेतेपदं आहे. दुसरीकडे कॅरोलिनचा हा या मोसमातला सहावा अंतिम सामना होता.