पुणे : वीस हजार रुपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी पर्यवेक्षकाला पकडण्यात आले आहे. बांधकाम नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी आणि बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी पर्यवेक्षकाने लाचेची मागणी केली होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी शिवाजीनगर परिसरात केली. गोपीचंद दत्तात्रेय पठारे (45) असे कर्मचार्याचे नाव आहे. गोपीचंद पठारे बिगारी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने 2004 साली केलेल्या बांधकाम नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करण्यासाठी व परवानगी नकाशाची नक्कल मिळण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी पठारे याने 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये तडजोड करत 20 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. याची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने याची पडताळणी करून शिवाजीनगर गावठाण येथील दिलीप टी हाऊसमध्ये सापळा रचून लाच स्वीकारताना पठारे याला पकडले.