मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आगामी सत्रासाठी प्लेयर ड्राफ्ट 23 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. त्यावेळी जमशेदपूर एफसी आणि बंगळूरु एफएसी या दोन नवीन संघासह लीगमधील जुन्या संघांमध्ये खेळाडू निवडण्यासाठी चढाओढ पहायला मिळेल. हिरो आयएसएलच्या नियमावलीनुसार संघाना 21 वर्षांखालील 2 उदयोन्मुख खेळाडूंसहित कमीतकमी 15 तर जास्तीतजास्त 18 भारतीय खेळाडू, आपल्या चमूत असणे अनिवार्य आहे. गत हंगामात खेळलेल्या संघातून जास्तीतजास्त 2 वरिष्ठ खेळाडू तर 21 वर्षांखालील 3 खेळाडू उदयोन्मुख खेळाडूंचा कोटा भरण्यासाठी संघ कायम राखू शकतात.
खेळाडू राखण्याच्या नियमांचा वापर करत नऊ पैकी आठ संघांनी 22 घरगुती खेळाडू संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने राखले आहेत तर दिल्ली डायनामोजनी आगामी मोसमासाठी नव्याने सुरवात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नवीन आयसीएल संघ जमशेदपूर एफसीला पहिल्या आणि दुसर्या फेरीत प्रथम पसंतीची संधी असेल तर दिल्ली डायनामोजला दुसर्या पसंतीचा अधिकार असेल.
एफसी पुणे सिटीने एक वरिष्ठ खेळाडू राखला आहे जो वरच्या दोन संघांच्या नंतर दुसर्या फेरीत सुरवात करेल तर चेन्नईयन एफसी वगळता इतर तीन क्लब्स तिसर्या फेरीपासून ड्राफ्टमध्ये भाग घेतील. चौथ्या फेरीपासून प्लेयर्स ड्राफ्टमध्ये भाग घेणारा चेन्नईयन एफसी हा एकच क्लब असेल. 2015 च्या विजेत्यांनी उदयोन्मुख जेरी लालरीनजुआला या 21 वर्षाखालील गटात येणार्या खेळाडूला इतर दोन वरिष्ठ खेळाडूंच्या बरोबर राखल्यामुळे ते तिसर्या फेरीपासून सुरवात करतील. आयएसएल 2017-18 प्लेयर्स ड्राफ्ट मध्ये एकूण 15 फेर्या असतील. प्रत्येक क्लबसाठी ड्राफ्ट प्लेअर फेर्यांच्या निवडीचा क्रम ड्रॉ ऑफ लॉटद्वारे शनिवारी संध्याकाळी ठरवण्यात येईल. इन्स्टंट ट्रेडिंग कार्ड आयएसएल 2015 मध्ये यशस्वीपणे आणण्यात आले ज्याद्वारे संघांना आधी निवडलेल्या खेळाडूचा व्यवहार करता येतो. तिसर्या फेरीपासून एखाद्या दुसर्या क्लबने ड्राफ्ट मधल्या निवडीची घोषणा केली की इन्स्टंट ट्रेड प्रोसेस 15 सेंकदात बझर वाजवून चालू करू शकेल. क्लब्सचे प्रतिनिधी इन्स्टंट ट्रेडिंग टेबलवर जमा होऊन योग्य त्या वाटाघाटी करून निर्धारित वेळेत व्यवहार पूर्ण करतील.