200 कोटींचे कर्ज कशाला? मुख्यसभेत सभासदांचा सवाल

0

पुणे । बहुचर्चित चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जलवाहिनी टाकण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात 302 कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच महापालिकेच्या तिजोरीतही तब्बल 2200 कोटी रुपयांची गंगाजळी शिल्लक आहे. असे असताना दरमहा दीड कोटींचे व्याज देऊन 200 कोटींचे कर्जरोखे काढलेच कशाला? असा सवाल मुख्यसभेत सभासदांनी शुक्रवारी केला.

298 कोटी शिल्लक
प्रश्न उत्तराच्या तासात काँग्रेस नगरसेवक आबा बागुल यांनी अर्थसंकल्पामध्ये समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या कामासाठी किती कोटींची तरतूद केली आहे? असा प्रश्न बागूल यांनी उपस्थित केला असता, 304 कोटींची तरतूद असून त्यापैकी 4 कोटी खर्च झाले असल्याचे कळसकर यांनी सांगितले. त्यावर यंदाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींपैकी 298 कोटी रुपये शिल्लक असताना 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढलेच कशाला, असा प्रश्‍न उपस्थित केला.

सभासदांनी प्रशासनाला धरले धारेवर
सभासदांच्या विचारलेल्या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले. गरज भासेल तसे कर्जरोखे उभारण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र, बँकेत ठेवी, अनामत रक्कमा आणि अंदाजपत्रकातील तरतूद शिल्लक असताना कर्जरोखे काढण्याची परवानगी कोणी दिली? असा सवालही यावेळी उपस्थित झाला. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी हस्तक्षेप करत आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा करण्याची ग्वाही सभासदांना दिली.