धुळे । शहरात 200 खाटांचे जिल्हा रूग्णालय मंजूर झाले असून ते त्वरित सुरु करावे, गरीब मजूर कुटूंबांना केशरी रेशनकार्डावर स्वस्त दरात धान्य मिळावे, अशी मागणी करीत आज धुळे महानगर समाजवादी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरित झाल्यानंतर साक्रीरोड वरील जुने जिल्हा रूग्णालयात 200 खाटांचा विभाग मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचार्यांची भरती प्रक्रियाही सुरु झाली आहे. त्यामुळे हे रूग्णालय तात्काळ सुरु करावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
जुने रूग्णालय पुन्हा सुरू करा
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरीत झाल्यानंतर गरीब रूग्णांना आर्थिक परिस्थिती नसल्याने खाजगी वैद्यकीय सेवा घेता येत नाही. त्यांना शहरापासून 6 ते 8 किलोमीटर वैद्यकीय सेवा घेण्यास जाण्यात अडचणी येत असतात. शहरापासून लांब जातांना प्रवासाचा खर्च देखील वाढ याचा भूर्दंड गरीब रूग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. यामुळे साक्री रोडवरील जुने जिल्हा रूग्णलाय सुरू करण्याची मागणी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात येत आहे.
यांचा होता सहभाग
या आंदोलनात धुळे महानगर समाजवादी पार्टीचे अकिल अन्सारी, इनाम सिध्दीकी,जमिन मन्सुरी, कल्पना गंगवार, अमिन पटेल, गौरव शर्मा, आलमगिर, रशिद, गुलाम कुरेशी, डॉ.दीपाली नाईक, गुड्डु काकर, नायब खान, शकिल अन्सारी, मोहसीन शेख, डॉ.अबुल हसन, जाकीर खान, सादीक असलम, आसीफ पठाण, नावेद अन्सारी, आरीफ शाह, अकिल शाह, सलिम धोबी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गरीबांना आर्थिक फटका
सद्यस्थितीत असलेले चक्करबर्डी येथील वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रूग्णालय हे शहरापासून 6 ते 8 कि.मी. लांब असल्याने किरकोळ आजारासाठी उपचार घेण्यास जाणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने साक्रीरोडवरील जुने जिल्हा रूग्णालय तत्काळ सुरु करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय अल्पउत्पन्न असलेल्या गरीब मजूर, पॉवरलुम कामगार, गवंडी कामगार, अपंग निराधार, विधवा, घटस्पोटीत, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख असलेल्या केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त दरात धान्य मिळावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.