भुसावळ। विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही तासांवर आल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील बाजार हजारो भाविकांच्या वर्दळीने फुलला होता. श्रींच्या स्थापण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य तसेच सजावटीचे साहित्य घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. बाप्पांच्या स्वागतासाठी विशेष म्हणजे पाऊसही धावून आल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. नाचत-गाजत रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांतर्फे श्रींची मूर्ती नेली जात असल्याचे चित्र शहरात होते.
उपद्रवींना शहर बंदी
सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या उपद्रवींना उत्सव काळात शहर बंदी करण्यासंदर्भात दाखल प्रस्तावांवर शुक्रवारी कारवाई होणार असून त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत शहर बंदी होणार आहे. फैजपूर येथील दोघा उपद्रवींच्या हद्दपारीचे आदेश निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यंदा बाप्पा 12 दिवस मुक्कामी
चौदा विद्या व पासष्ट कलांचा अधीपती असलेल्या गणरायाचा उत्साह यंदा 12 दिवसांचा असणार आहे. त्याला कारण तब्बल सात वर्षांनी जुळून आलेल्या दशमीच्या वृद्धीचे ठरले आहे. यंदा बाप्पा 12 दिवस मुक्कामी राहणार असल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. ब्रह्ममुहूर्तापासून पहाटे 4.30 ते 5 वाजल्यापासून दुपारी 1.45 वाजेपर्यंत भाविकांना श्रींची स्थापना करता येणार आहे.
भाविकांच्या वर्दळीने फुलली बाजारपेठ
गुरुवारी हरतालिका सण असल्याने व शुक्रवारी श्रींची स्थापना होणार असल्याने पूजेचे तसेच सजावटीचे साहित्य घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी शहराच्या बाजारपेठेत झाली होती. राज्या-परराज्यातून तसेच पेणच्या श्रींच्या मूर्ती शहरात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत शिवाय गुलाल, अगरबत्ती, फुलहार, मद्रा, केळीचे खांब आदींना मोठी मागणी राहिली.
शहरात 200 मंडळे
शहरातील तब्बल 200 खाजगी व सार्वजनिक मंडळांकडून यंदा श्रींची स्थापना होणार आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीत 99 मंडळे असून त्यात खाजगी दोन व 97 सार्वजनिक आहेत तर बाजारपेठ हद्दीत 98 मंडळे असून चार खाजगी व 94 सार्वजनिक आहेत. दोघा हद्दीतील बहुतांश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेतली आहे तर अन्य उर्वरीत मंडळांकडून रात्री उशिरापर्यंत परवानगी घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सजावटीला दोन दिवस अवधी
शहरातील गणेश मंडळांनी शंभर वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे. यंदा अनेक मंडळांनी सामाजिक प्रबोधनावर तसेच जिवंत विषयांवर प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याकडे कल दर्शवला आहे. शुक्रवारी श्रींची स्थापना होत असलीतरी प्रत्यक्षात मात्र देखाव्यांचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे शिवाय काही मंडळांचे मात्र काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
गणपती माझा नाचत आला…
दुःखहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे भाविकांच्या आनंदाची जणू पर्वणीच… विद्या व कलेची देवता असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील भाविकांमध्ये आनंदाला भरते आले आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळपर्यंत शहरातील विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गात बाप्पांची मूर्ती विविध मंडळांकडून स्थापना स्थळी नेण्यात येत होती. बाप्पांच्या स्वागतासाठी अधून-मधून पावसाने हजेरी देत गणेश भक्तांचा उत्साह वाढवला होता. काही मंडळांनी नजीकच्या बर्हाणपूर शहरातून वाहनांद्वारे मूर्ती आणल्या. वाहनातही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता तर भुसावळ येईपर्यंत गणरायाचा जयघोष सुरूच होता. शुक्रवारी दिवसभरात श्रींची विधीवत स्थापना होणार आहे.