2000 ची नोट बंद होणार?

0

नवी दिल्ली : बनावट नोटांचा अटकाव घालणे आणि ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार या वर्षअखेरपर्यंत 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. भारतीय रिझर्व्ह बँक 50, 100, आणि 500 रुपयांच्या नोटांचा बाजारपेठेत पुरवठा वाढवित असून, ऑगस्टअखेर 200 रुपयांनी नवीन नोटही चलनात येईल, असेही सूत्र म्हणाले. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा एक भाग म्हणून बँकांनी आपले एटीएम रिकॅलिब्रेट करण्यास सुरुवात केली असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे. 500 रुपयांच्या नोटांना जास्त जागा मिळण्यासाठी एसबीआय आपले एटीएम रिकॅलिब्रेट करत आहे.

तीन वर्षात 71,941 कोटींची अवैध संपत्ती सापडली
दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याबाबत अद्याप केंद्र सरकार किंवा आरबीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, आरबीआय छोट्या नोटांचा बाजारपेठेत पुरवठा वाढवित आहे. बनावट नोटा रोखणे आणि ऑनलाईन पेमेंटची संख्या वाढणे यासाठी ही मोठी नोट चलनातून हद्दपार करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. दरम्यान, नोटाबंदीच्या काळात 5400 कोटी रुपयांची अवैध रोख संपत्ती आणि 303.367 किलोंचे सोने हस्तगत झाले असल्याची माहितीही अर्थमंत्रालयाच्या सूत्राने दिली. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासही माहिती दिली असून, गेल्या तीन वर्षात 71 हजार 941 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती सापडली असल्याचे त्यात नमूद आहे. प्राप्तिकर खाते मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता, संपत्तीचा शोध घेत असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.