नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चलनातून सर्वात मोठी असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोट बंद करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तूर्त तरी या नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँकेने थांबविली असून, तशाप्रकारची शंका स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या संशोधन अहवालात नमूद केली आहे. मोठ्या नोटांचा पुरवठा आरबीआयने बंद केला असून, दोन हजार रुपयांऐवजी 500च्या नोटा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी नोटाबंदीनंतर आपल्याकडील काळापैसा दोन हजार रुपयांच्या नोटांत परावर्तीत केला होता, त्यांना मोठा झटका बसला आहे. 50 हजार रुपयांपेक्षा मोठे व्यवहार हे रोख न करता धनादेशाव्दारे करण्याची सक्ती आरबीआयने केली असून, हे व्यवहार करताना बँका पॅनकार्ड क्रमांक मागत आहेत. त्यामुळे मोठ्या व्यवहारातून काळा पैसा पांढरा करण्याचेही मार्ग आता बंद झालेले आहेत. शिवाय, नोटाबंदीनंतर मोठी रक्कम बँकांत जमा करण्यात आलेल्या खात्यांचीही तपासणी प्राप्तिकर खाते करत आहेत.
छोट्या मूल्यांच्या नोटांचे प्रमाण वाढविले
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपला संशोधन अहवाल नुकताच जाहीर केला. त्या अहवालानुसार, 8 डिसेंबर 2017 पर्यंत मोठ्या नोटांच्या स्वरुपातील 15 लाख 78 हजार 700 कोटी रुपयांच्या चलन मूल्यांच्या नोटांची छपाई करण्यात आली होती. त्यापैकी दोन लाख 46 हजार 300 कोटी रुपयांच्या नोटा चलनात पाठविण्यात आलेल्या नाहीत. तसेच, केंद्रीय बँक (आरबीआय) मोठ्या नोटांची छपाई बंद करण्याची शक्यता असून, त्यानंतर चलनातूनही या नोटा बंद करू शकते. केंद्र सरकारतर्फे लोकसभेला पाठविण्यात आलेली आकडेवारी व आरबीआयच्या वार्षिक अहवालातील आकडेवारी यांचा अभ्यास करून हा अहवाल एसबीआयने तयार केलेला आहे. मार्च 2017 पर्यंत छोट्या मूल्यांच्या नोटांचे मूल्य तीन लाख 50 हजार 100 कोटी इतके होते. या मूल्याच्या नोटा आरबीआयकडून सातत्याने चलनात पाठविल्या जात आहेत.
मोठ्या नोटा छापल्या, परंतु थांबवून धरल्या!
आरबीआयने 8 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या 1695.70 कोटींच्या नोटा छापल्या असून, याच कालावधीत त्यांनी दोन हजारांच्या केवळ 365.40 कोटींच्या नोटा छापल्या होत्या. सद्या चलनातील या नोटांचे एकूण मूल्य 15 लाख 78 हजार 700 कोटी असल्याचेही एसबीआयच्या अहवालात नमूद आहे. या अहवालाच्या लेखिका तथा एसबीआयच्या प्रमुख आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी सांगितले, की छपाईची आकडेवारी पाहाता, आरबीआयने एकूण 2643 अब्ज रुपये मूल्य असलेल्या नोटा छापल्या असून, या पैकी बहुतांश नोटा या चलनात आलेल्या नाहीत. 50 व 200 रुपयांच्या नोटा मात्र चलनात वाढविण्यात येत आहेत, असे निरीक्षणही सौम्या घोष यांनी नोदविले आहे. चलन तुटवडा रोखण्यासाठी आरबीआयने सुरुवातीला दोन हजारांच्या मोठ्या नोटा चलनात आणल्यात, परंतु आता या नोटा चलनातून हळूहळू काढून घेतल्या जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मागीलवर्षी पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यावेळी एकूण चलनाच्या 86-87 टक्के इतकी त्यांचे मूल्य होते.