2000 च्या नोटांची छपाई बंद!

0

नवी दिल्ली : नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती. परंतु, आता आरबीआयने या नोटाची छपाई बंद केली आहे. सूत्राच्या माहितीनुसार, छोट्या नोटाच चलनात ठेवल्या जाणार असून, आरबीआयने पाच महिन्यांपूर्वीच या सर्वात मोठ्या नोटाची छपाई बंद केलेली आहे. तसेच, पुढील महिन्यात 200 रुपयांची नोट चलनात आणली जाणार असून, या पुढे 500 रुपयांची नवीन नोट ही चलनातील मोठी नोट राहणार आहे. आरबीआयने आतापर्यंत 500 च्या 14 अब्ज नोटा छापल्या आहेत. तर दोन हजाराच्या नोटा सुरुवातीच्या केवळ चार महिन्यातच चलन तुटवडा दूर करण्यासाठी छापण्यात आल्या होत्या.

म्हैसूरच्या टांकसाळींत 200 च्या नोटांची छपाई
काळा पैसा रोखणे आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चलनातील सर्वात मोठी नोट असलेल्या दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली असून, त्याऐवजी 200 व 500 रुपयांच्या नोटा छापल्या जात आहेत. सद्या छापल्या जात असलेल्या 90 टक्के नोटा या 500 रुपयांच्या आहेत. तर आरबीआयच्या म्हैसूर येथील टांकसाळीत सद्या 200 रुपयांच्या नोटांची छपाई जोरात सुरु आहे. मार्चमध्ये अर्थमंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर आरबीआयने या नोटाचे स्वरुप निश्चित केले होते. तसेच, या नोटांच्या चलनात येण्यामुळे चलन टंचाईही दूर होईल, अशी अपेक्षा अर्थमंत्रालयाला आहे.

बँकांकडून एटीएम रिकॅलिब्रेशन सुरु
2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असली तरी, या नोटा तूर्त तरी चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारचा काहीही इरादा नाही. या नोटा चलनात कायम राहणार आहे. परंतु, त्यांची संख्या मर्यादित असेल. त्यांच्याऐवजी दोनशे रुपयांच्या नोटांचे चलन बाजारपेठेत वाढवले जाईल. नवी नोट बाजारात येण्यापूर्वीच स्टेट बँकेसह काही बँका आपले एटीएम रिकॅलिब्रेट करून घेत आहेत. शिवाय, केंद्र सरकारनेही डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी मोठ्या नोटा चलनातून बाद करण्यासाठी आतापासून पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

संसदेत अरुण जेटलींनी साधली चुप्पी
केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नोटाबंदीची तयारी करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर आता दोन हजारांची नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळेच राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबद्दल प्रश्न विचारले. मात्र विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी करुनही जेटली यांनी या प्रकरणात शांत राहणेच पसंत केले. त्यामुळेच सरकार पुन्हा एकदा नोटाबंदी करण्याच्या विचारात असल्याची जोरदार चर्चा संसदेत होताना दिसते आहे. इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.