नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे काळे ढग जमा झाले आहेत. आयसीसी विश्वचषक 2011 क्रिकेट स्पर्धा जिंकणार्या भारतीय संघातील एक खेळाडू सध्या मॅच फिक्सिंगप्रकरणी संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. या खेळाडूचे मॅच फिक्सिंग करणार्या रॅकेटशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या खेळाडूने राजपुताना टी-20 लीगमध्ये खेळताना सामना फिक्स केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
राजपुताना प्रीमियर लीगमधील (आरपीएल) काही घटनांची गेल्या वर्षापासून राजस्थान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. तसेच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या रडारवरही गेल्या वर्षापासून ही स्पर्धा होती. निओ स्पोर्ट्सने या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले होते. या लीगमधील अंतिम सामन्यात एका गोलंदाजाने चक्क 8 वाईड बॉल टाकले होते. यामुळे बीसीसीआयला राजपूताना प्रीमीअर लीगच्या आयोजनाबद्दल संशय आला होता. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयने राजस्थान पोलिसांना या क्रिकेट स्पर्धेची चौकशी करण्याची विनंती केली होती. यानंतर राजस्थान पोलिसांनी जयपूरमधील 4 हॉटेलवर छापा टाकत 14 जणांना ताब्यात घेतले. या 14 संशयितांनी राजपूताना प्रीमिअर लीगच्या आयोजक, खेळाडू, पंचांशी संपर्क साधल्याचे समोर आले.