मुंबई : 2014 चा राजकीय अपघात 2019 सालात होणार नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे असंख्य डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्याच डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल, असा दावा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्ताने हा दावा करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.
‘लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा ‘हम करे सो कायदा’ सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,’ असा हल्ला उद्धव यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर चढवला आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती तरी लोक म्हणाले की, ‘इकडे मोगलांचे राज्य आहे. ते केवढे विराट आहे. दक्षिणेकडील राष्ट्रे किती मोठी आहेत. त्यांच्याजवळ पैसा आहे. साम्राज्य आहे. या शिवाजीजवळ पगार द्यायला पैसा नाही, हा कसली स्वराज्याची स्थापना करतो. याच्यामागे कोण जाणार?’ असे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील जागीरदार, सरदार, सुभेदार म्हणत होते. आणि तरीही शिवाजी महाराजांनी आपले काम केले. याचे कारण आपल्या पश्चात शिवसेना उभी राहणार आहे. यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच जो विरोध शिवाजी महाराजांना झाला, तो शिवसेनाप्रमुखांना त्यांच्या वाटचालीत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.