2017 ठरले बांधकामक्षेत्रासाठी निराशाजनक; 7.44 टक्क्याने घसरण!

0

पुणे : मावळलेले 2017 हे वर्ष पुणे विभागातील बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहे. नोटाबंदी, जीएसटी व महारेरा या कायद्याचा या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. पुणे विभागात पुणेसह सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात गतवर्षीपेक्षा तब्बल 7.44 टक्क्यांनी बांधकाम क्षेत्रात घसरण नोंदविण्यात आली आहे. 2016 मध्ये 5 लाख 90 हजार 945 मालमत्तांची खरेदी-विक्री झाली होती. तर 2017 मध्ये 5 लाख 64 हजार 951 मालमत्तांची खरेदी-विक्री झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मरगळीचा राज्य सरकारच्या महसुलावरही मोठा परिणाम पडला असून, सरकारचा महसूल घटला आहे. 2018 मध्ये तरी ही परिस्थिती सुधारेल, अशी बांधकाम व्यवसायाला अपेक्षा आहे. पुण्यात तर अनेक बिल्डर आर्थिक संकटात सापडले असून, डीएसके प्रकरणानंतर बूकिंगवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.

नोटाबंदी, जीएसटीचा बसला फटका
राज्य महसूल विभागाकडील आकडेवारी तपासली असता सरासरी अर्धा दशलक्ष मालमत्तांची खरेदी-विक्री होत असते. सरासरी 50 पैकी एक कुटुंब नवे घर खरेदी करते किंवा विक्री तरी करते. परंतु, यावर्षी या व्यवसायात प्रचंड मरगळ आलेली दिसून आली. नोटाबंदी व नंतर जीएसटी असा या व्यवसायाला जबरदस्त फटका बसला. 2016 पर्यंत पुणेसह पुणे विभागात मालमत्तांच्या किमती सारख्या वाढत होत्या. परंतु, सप्टेंबरपासून मालमत्तांच्या किंमती स्थिर झाल्यात. त्यानंतर बहुतांश शहरात या किंमतीत घसरण सुरु झाली होती. 2017 मध्ये बांधकाम व्यवसायाबाबत सरकारच्या धोरणात सातत्याने बदल होत गेलेत. 1 मे 2017 पासून राज्य सरकारने महारेरा कायदा लागू केला. त्यानंतर लगेचच 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा लागू केला. त्यामुळे खरेदी-विक्रीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मंदावली. या सरकारी धोरणांचा बिल्डर लॉबीलाही मोठा फटका बसला असून, बांधकामपूर्व बूकिंग जवळपास बंद पडले असून, तयार घरे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

पुण्यात सदनिकांची विक्री मंदावली
जूनपासूनच नवीन बांधकाम प्रकल्पाच्या नोंदणीमध्ये जवळपास 10 टक्क्याने घट झाली. म्हणजेच, हे वर्ष बांधकाम व्यावसायासाठी अजिबात चांगले नाही याची जाणिव बांधकाम क्षेत्राला झाली होती. जुलैनंतर जीएसटीमुळे कररचनेतही बदल झाला. त्याचा फटका बांधकाम व्यावसायाला बसला. नवीन व तयार घरे विकताना बिल्डर लॉबीची दमछाक झाली. सरासरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घरांची खरेदी-विक्री जास्त होते. परंतु, या काळातही व्यवहार मंदावल्याचे दिसून आले. नोव्हेंबर 2016च्या तुलनेत नोव्हेंबर 2017 मध्ये सर्वात कमी व्यवहार झालेत ही बाबदेखील चिंताजनक होती. पुणे शहरात जुलै ते डिसेंबर 2017 या कालावधीत 36 हजार 68 सदनिकांची विक्री झाली. गतवर्षी याच कालावधीत ही विक्री 46 हजार 291 इतकी होती. म्हणजेच, 22 टक्क्यांनी सदनिका कमी विकल्या गेल्या आहेत. रेरा व जीएसटीमुळे नवीन घरांच्या विक्रीत सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहितीही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.