2017 मध्ये भारताने मारले 138 पाक सैनिक

0

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने मागील वर्षी सीमेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या 138 जवानांना ठार केले आहे. सरकारच्या गुप्तचर संस्थांनी ही माहिती दिली आहे. सीमेवर कुरापती करणार्‍या पाकविरोधात भारताचे हे मोठे यश आहे. मात्र, चीनच्या बाबतीत काहीशी वेगळी स्थिती आहे. चीनने 2017 मध्ये 415 वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केली असून 216 वेळा चिनी-भारतीय सैन्य आमने-सामने आले होते, अशी आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर 2017 या वर्षात पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. प्रत्येक वेळी भारतीय सैन्याने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. या कारवायांमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले तर अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. सीमा सुरक्षा दलाने सप्टेंबर 2017 मध्ये केलेल्या मऑपरेशन अर्जुनफ या कारवाईत पाकिस्तानचे माजी सैनिक, आयएसआय आणि पाक रेंजर्सच्या अधिकार्‍यांच्या घर आणि शेतांना लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणांहून भारतविरोधी कारवायांसाठी मदत केली जात होती. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानी रेंजर्सना गोळीबार थांबवण्याचे आर्जव भारताकडे करावे लागले.

चीनची 2017 मध्ये 415 वेळा घुसखोरी
वर्ष 2017 मध्ये चीनने नियंत्रण रेषेवर 415 वेळा घुसखोरी केली तर 2016 मध्ये हा आकडा 271 इतका होता. यात 2017 मध्ये दोन्ही देशातील सैन्य 216 वेळा आमने-सामने उभे ठाकले होते. तर 2016 मध्ये 146 वेळा समोरासमोर आले होते. भारतीय सैन्यदलाच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार नियंत्रण रेषेवर 23 वेळा दोन्ही देशांमध्ये गंभीर वादाचे प्रसंग घडले. यामध्ये लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरूणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला आणि दिबांग घाट सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

जमिनीवरील गस्त वाढवण्याची गरज
चीनमधील भारताचे राजदूत अशोक कांता यांनी यासंदर्भात म्हंटले की, घुसखोरांची संख्या महत्वाची नाही. आपल्याला घुसखोरी करण्याची पद्धत समजण्यासाठी संतुलित आकड्यांची आवश्यकता आहे. आपल्याला हे माहीत करून घेतले पाहिजे की, हे क्षेत्र नेहमीचे वादग्रस्त क्षेत्र आहे की, आणखी नव्या परिसरातून चिनीकडून घुसखोरी होत आहे. दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आल्यानंतर उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल भाटिया म्हणाले की, घुसखोरीची वाढती संख्या पाहता जमिनी स्तरावरील गस्त वाढवण्याची आम्हाला गरज असल्याचे दिसून येते.