अतिआत्मविश्वासात अडकू नका – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली – करोना आपल्यापर्यंत पोहचणार नाही, अशा भ्रमात राहण्याची चूक करू नका. आपल्याकडे म्हटले जाते, सावधानता हटी, दुर्घटना घटी…म्हणून अतिआत्मविश्वासात फसू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधतांना केले. भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही जनताकेंद्री आहे. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनतेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यामुळेच आज भारताचे आभार मानले जात आहे. संपूर्ण जग करोनाविरोधात एकवटले आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेने याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाउनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने लढत आहे. सफाई कर्मचार्‍यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. करोनाच्या काळात सगळेचे झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळेच स्वच्छता ठेवणार्‍यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कुणी घरभाडे माफ करतोय, कुणी किराणा देतोय. शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत करून देशात कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेत आहे. कुणी पेन्शन देत आहे, कुणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसर्‍यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे, असे म्हणत मोदी यांनी सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले.

मास्क हे सभ्य समाजाचे प्रतिक

करोनामुळे समाजात मोठे परिवर्तन दिसून येत आहे. करोनामुळे मोठे बदल झालेत. लोक मास्कचा वापर करत आहेत. आता मास्कप्रती लोकांची धारणा बदलणार आहे. आता मास्क हे सभ्य समाजाचे प्रतिक बनेल. माझ्यामते उपरण्याचा वापर करावा. अगोदर इथे-तिथे थुंकणे ही साधारण गोष्ट समजली जात होती. ही समस्या आहे हे माहीत होते पण ती काही केल्या संपत नव्हती. आता या वाईट सवयीला कायमचे संपवण्याची वेळ आली आहे, असेही म्हणत मोदींनी नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले.