2018 मध्ये भारताचा जीडीपी 7 टक्क्यांच्या पुढे!

0

मोदी सरकारला दिलासा : संयुक्त राष्ट्रांचा पाहणी अहवाल

नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षामध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपी दर हा सात टक्क्यांच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या डेवलपमेंट पॉलिसी आणि अ‍ॅनलायसिस विभागाने व्यक्त केला आहे. या संबंधी नुकतेच संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल सादर केला असून, यामध्ये 2018 या वर्षात भारताचा जीडीपी दर हा 7.2 टक्के इतका असणार असल्याचे म्हटले आहे.

आशिया खंडाच्या चांगल्या प्रगतीचे संकेत
संयुक्त राष्ट्रांनी आपला यंदाचा ’वर्ल्ड इकोनॉमिक सिच्युएशन अ‍ॅण्ड प्रॉस्पेक्ट्स 2018’ हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये येत्या आर्थिक वर्षामध्ये आशिया खंडाची आर्थिक प्रगती ही इतर देशांच्या तुलनेनी अधिक होणार असल्याचे यात म्हटले आहे. तसेच संपूर्ण जगाच्या एकूण जीडीपीमध्ये आशियाई देशांचा वाटा अधिक असणार असून, यामध्ये भारताचा जीडीपी दर हा सर्वात अधिक असणार असल्याचेदेखील म्हटले आहे.

पाकिस्तानचा जीडीपी मात्र घसरणार
भारत सरकारने स्वीकारलेल्या नव्या धोरणांमुळे 2017 मध्ये भारताचा जीडीपी हा 6.7 टक्के इतका राहिला आहे. हाच दर येत्या 2018 मध्ये 7.2 टक्के तर 2019 मध्ये तो 7.4 टक्के इतका असणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच बांगलादेशचा जीडीपीदेखील येत्या दोन वर्षांमध्ये सात टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता या अहवालात म्हटले. तर या उलट इराण आणि पाकिस्तान याचा जीडीपी मात्र येत्या दोन वर्षांमध्ये दोन टक्क्यांनी खाली घसरण्याची शक्यतादेखील या अहवालात वर्तवण्यात आली आहे.