2019 मध्ये भाजपचा पराभव निश्‍चित : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावरील उपोषण आंदोलनानंतर भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना चिरडणे आणि देशात दुही माजवणे हीच भाजपची विचारसरणी असून, या विचारसरणीमुळेच देशातील वातावरण आज पूर्णपणे गढूळ झाले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप दलितविरोधी आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा लाजीरवाणा पराभव करू, असा पुनरुच्चार राहुल गांधींनी यावेळी केला. उपोषणानंतर राहुल पत्रकारांशी बोलत होते. आम्ही भाजपच्या विचारसरणीविरोधात येथे उभे ठाकलो आहोत आणि यापासून कदापि मागे हटणार नाही, असेही राहुल यांनी ठणकावून सांगितले.

भाजपचे दलित खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत असल्याबद्दल विचारले असता, मोदी दलितविरोधी आहेत, असे भाजपमधील दलित खासदारांचेही मत तयार झाले असल्याचे राहुल म्हणाले. मोदींना दलितांचे हित नको असल्याचे हे खासदार आम्हाला सांगत असल्याचा दावाही राहुल यांनी केला.

राहुल यांच्यासोबत राजघाटावर उपोषणासाठी गेलेले काही काँग्रेस नेते सकाळी छोले-भटुर्‍यांवर ताव मारत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याबाबत विचारले असता राहुल यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला.