सरकारी कर्मचार्यांना मिळणार 21 सुट्ट्या
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रखडकलेल्या 2019 या वर्षातील शासकीय सुट्ट्यांचा विषय सरकारने मार्गी लावला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासाठी राजपत्र काढून राज्यातील सरकारी, निमसरकारी आदींना देण्यात येणार्या शासकीय सुट्ट्यांची माहिती जाहीर केली. त्याप्रमाणे राज्यात रविवारच्या तीन सुट्ट्या सोडून 21 सुट्ट्या सरकारी कर्मचारी, अधिकारी आदी वर्गांना मिळणार आहेत. त्यातच 14 एप्रिल, लक्ष्मीपूजन, ईद-ए- मिलादच्या सुट्ट्या रविवारी आल्याने या सुट्ट्यांना सरकारी नोकर मुकणार आहेत. तर बँक कर्मचारी वर्गाला वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल रोजीची शासकीय सुट्टी असणार आहे. तर ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू असणार नाही.
शासकीय सुट्ट्या जाहीर करताना त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सरकारने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी बर्याच हालचाली शासकीय सुट्ट्यांच्या नियोजनादरम्यान झाल्या होत्या. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या राजपत्रातून समोर आले आहे. त्यामुळे 6 डिसेंबरच्या शासकीय सुट्टीचा विषय बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.
या आहेत 2019 च्या शासकीय सुट्ट्या
1. प्रजासत्ताक दिन- 26 जानेवारी, 2. छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी, 3. महाशिवरात्री- 4 मार्च, 4. होळी – 21 मार्च, 5. गुढीपाडवा – 6 एप्रिल, 6. रामनवमी – 13 एप्रिल, 7. महावीर जयंती – 17 एप्रिल, 8. गुड फ्रायडे – 19 एप्रिल, 9. महाराष्ट्र दिन – 1 मे, 10. बुद्ध पौर्णिमा – 18 मे, 11. रमझान ईद – 5 जून, 12. बकरी ईद – 12 ऑगस्ट, 13. स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट, 14. पारशी नववर्ष – 17 ऑगस्ट, 15. गणेश चतुर्थी – 2 सप्टेंबर, 16. मोहरम- 10 सप्टेंबर, 17. महात्मा गांधी जयंती- 2 ऑक्टोबर, 18. दसरा – 8 ऑक्टोबर, 19. दिवाळी (बलिप्रतिपदा)- 28 ऑक्टोबर, 20. गुरुनानक जयंती – 12 नोव्हेंबर, 21. ख्रिसमस – 25 डिसेंबर.