२०१९ला २०१४ पेक्षा अधिक जागा जिंकू-अमित शहा

0

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उत्तरप्रदेशातील कार्यसमितीच्या बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या बैठकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. यावेळी भाजपा नेत्यांना २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मंत्र अमित शहा यांनी दिला.

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम तुम्ही सर्वांनी करा, असे अमित शहा यांनी या बैठकीत पार्टीच्या नेत्यांना सांगितले. दरम्यान, उत्तरप्रदेशातील मेरठ पश्चिमेकडील मोठे राजकीय केंद्र आहे. याठिकाणी १२ वर्षांनंतर भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याआधी कानपूर, मिर्जापूर, चित्रकूट आणि लखनऊमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अमित शहा यांनी काल कोलकाता येथे भाजपच्या युवा मोर्चाद्वारे आयोजित केलेल्या युवा स्वाभिमान सभेमध्ये बांगलादेशी घुसखोरीवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणाले, भाजपा बंगाल विरोधी नसून ममता विरोधी आहे. आमच्या पक्षाची सुरुवातच बंगालच्या शामा प्रसाद मुखर्जी यांनी केली, मग भाजपा पश्चिम बंगाल विरोधी कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या. आसाममधील घुसखोरांना खड्यासारखे निवडून बाजुला करण्यात येणार आहे. ममता यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही. ममता कोणत्या उद्देशाने बांगलादेशी घुसखोरांना छत्रछाया देत आहेत. काँग्रेसनेही याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान यावेळी अमित शहा यांनी केले.