इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल !

0

स्वीडन: गेल्या दोन तीन दिवसांपासून नोबेल पुरस्कार जाहीर केला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञांना पुरस्कार जाहीर झाला. काल साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान आज शुक्रवारी इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना २०१९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे.

“२०१९ चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्‍या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांनी यासाठी दिलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

“इथिओपियात सध्या अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. मात्र, पंतप्रधान अबिय अहमद हे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सलोखा, एकता आणि समाजिक न्याय या बाबींना नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच ते नोबेल शांती पुरस्कारासाठी लायक आहेत,” असेही नॉर्वेच्या नोबेल समितीने म्हटले आहे.

अबिय अहमद यांच्यासोबत स्विडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थंबर्ग या देखील शांती पुरस्काराच्या शर्यतीत होत्या.