फेब्रुवारी २०१९ पासून रात्री एटीएममध्ये रोकड भरणा होणार नाही

0

नवी दिल्ली-२०१९ पासून देशातील शहरी भागात कुठल्याही एटीएममध्ये रात्री ९ वाजेनंतर व ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेनंतर पैशांचा भरणा बँकांना करता येणार नाही. तसेच नक्षलग्रस्त भागात एटीएममध्ये पैसे भरण्याची मुदत सायंकाळी चार वाजेची असणार आहे, शिवाय नोटा आणताना प्रवासात दोन रक्षक बरोबर असणे आवश्यक राहणार आहे, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

खासगी संस्थांनी बँकांकडून दिवसाच्या पूर्वार्धातच पैसे घेऊन चिलखती वाहनांतून त्यांची वाहतूक केली जाणे आवश्यक असते. नवीन प्रमाणित परिचालन प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०१९ रोजी लागू होणार असून अनेकदा एटीएममध्ये भरण्यासाठी पैसे नेणाऱ्या वाहनांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.

देशात रोकड एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी ८ हजार खासगी वाहने उपलब्ध आहेत. ते बँकेतर संस्था चालवतात. त्यातून रोज १५००० कोटी रुपयांची वाहतूक होत असते. काही वेळा खासगी संस्था रात्री पैसे एटीएममध्ये भरतात. एटीएममध्ये पैसे भरणे व त्यांची वाहतूक याच्या वेळांवर मर्यादा येणार आहेत. ते काम शहरात रात्री ९ वाजेनंतर व ग्रामीण भागात सायंकाळी ६ वाजेनंतर करता येणार नाही. व्हॅनमध्ये एक सशस्त्र रक्षक पुढे व एक मागे राहील. पैसे भरताना किंवा काढताना एक रक्षक सतत असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांची नेमणूक यात प्रामुख्याने करण्यात यावी. पैसे वाहून नेणाऱ्या व्हॅनला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक करण्यात आले आहे.

कुठल्याही कॅश व्हॅनमधून एका वेळेला ५ कोटी पेक्षा जास्त पैसे नेता येणार नाहीत. रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनमध्ये पुढे मागे व मध्ये असे तीन सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक राहील. जीएसएमवर आधारित स्वयंचलित फोनचा वापर यात केला जाईल.