2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर!

0

नागपूर : देशातीला प्रत्येक भारतीयांना 2022 पर्यंत सर्व सुविधांनीयुक्त घर देण्याचा संकल्प आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी करत आहोत. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले सरकार अहोरात्र मेहनत घेईल. गरीबांना हक्काचे घर असेल, त्याला वैद्यकीय सेवा व शिक्षण मिळेल, कुणीही या सुविधांपासून वंचित राहणार नाही, त्यासाठी आपले सरकार काम करत आहे. हे कामच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे मोदींनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर डिजिधन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी भीम अ‍ॅपचे लाँचिंगसह आधार पे सेवेचाही शुभारंभ केला. जो तरुण भीम अ‍ॅप प्रमोट करेल त्यालादेखील पैसे कमाविण्याची संधी मिळेल. कुणी भीम अ‍ॅप शिकविला तर त्याला 10 रुपये आणि एखाद्या दुकानदाराने या अ‍ॅपच्या आधारे व्यवहार केला तर त्यांना 25 रुपये मिळतील, अशी घोषणाही मोदींनी केली. ही योजना 18 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना याप्रसंगी मोदींनी भगवान शिवशंकर या देवतेशी केली. बाबासाहेबांनी विष प्राशन करून अमृताचा वर्षाव केला. त्यांच्या 126 व्या जयंतीदिनी आपले सरकार 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प करत आहे. तर भीम अ‍ॅप अर्थव्यवस्थेत महारथीचे काम करेल, असेही मोदींनी याप्रसंगी सांगितले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रामदास आठवले यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.