पॅरीस । लॉसएंजेलिसने 2024 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाची दावेदारी सोडण्याची घोषणा करत 2028 मधील ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्यास संमती दिली आहे. लॉसएंजेलिसच्या या निर्णयामुळे 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पॅरीसमध्ये खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पॅरीस आणि लॉसएंजेलिस या शहरांनी 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी दावेदारी सांगितली होती. मागील जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या दोन शहरांची निवड केली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात होणार्या समितीच्या बैठकीआधी आपापसात चर्चा करुन दोन्ही शहरांना कुठलेही एक वर्ष निवडण्यास सांगितले. या दोन शहरांमध्ये सहमती झाली नसती तर समितीला निवडणुकीच्या माध्यमातून शहराची निवड करावी लागली असती.
लॉसएंजेलिस शिष्टमंडळाचे प्रमुख केसी वॉसरमॅन म्हणाले की, दोन्ही शहरांनी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक खेळांचे एकत्रित आयोजन करण्यास मान्य केले. सप्टेंबर महिन्यात होणार्या समितीच्या बैठकित दोन्ही शहरांमधील सहमतीचा प्रस्ताव मांडण्यात येईल. असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्श थॉमस बाख यांनी सांगितले.