मिशन शौर्य नंतर आता मिशन “शक्ती”
मुंबई : मिशन शौर्यच्या यशस्वी मोहिमेनंतर आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना 2024 च्या ऑलिंपिक साठी मिशन “शक्ती”च्या माध्यमातून सज्ज करणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात ते काल बोलत होते. मिशन शौर्य चे बीज कसे रुजले हे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मी चर्चा केली की जर तेलंगनाचे काही विद्यार्थी एव्हरेस्टवर जाऊ शकतात तर आपल्या जिल्ह्यातूनही विद्यार्थ्यांना एव्हरेस्टवर जाता आलं पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन केलं पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा एव्हरेस्टवर फडकला पाहिजे. त्यासाठी येणारा खर्च मोठा होता. डीपीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देता येतो का ते पाहिले, नंतर एव्हरेस्टला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च आदिवासी विकास विभागाने करावा अशी विनंती त्या विभागाला करण्यात आली. मी आदिवासी विकास विभागाला धन्यवाद देतो की त्यांनी या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली आणि मिशन “शौर्य” अंतर्गत प्रवास सुरु झाला तो एव्हरेस्ट सर करण्याचा. यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्तरावर प्रशिक्षण दिले गेले. या विद्यार्थ्यांचेही मनापासून कौतुक करावेसे वाटते कारण 19 ते 21 वयोगटातल्या या लहान तरूण-तरूणींनी भारताचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवला, महाराष्ट्राचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवला. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना गृह विभागात नोकरी देण्याची विनंती मी केली होती त्यांनी ती मोठ्या मनानं मान्य केली. मिशन शौर्य पूर्ण झालं, जिल्ह्यात एक उत्साह निर्माण झाला. आता पुढे काय या प्रश्नातूनच आता मिशन “शक्ती” चा जन्म झाला आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागात आता ऑलंपिक क्रीडा स्पर्धेसाठीची तयारी करण्यात येणार आहे. 2019 च्या ऑलंपिंकसाठी तयारीला वेळ कमी मिळतो म्हणून 2024 चे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. 2024 मधील ऑलिंपिकमध्ये किमान पाच क्रीडा प्रकारात या दोन जिल्ह्यातील आदिवासी तरूण तरुणी सहभागी होऊन भारतासाठी पदकं मिळवतील यादृष्टीने मिशन शक्ती अंतर्गत प्रयत्न करण्यात येतील. तिरंदाजी, जिमनॅस्टिक, शुटिंग, जलतरण आणि वेटलिफ्टींग हे ते पाच क्रीडा प्रकार आहेत. या क्रीडा प्रकारात यशस्वी होण्यासाठी या मुला-मुलींना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यालाही खूप मोठा खर्च अपेक्षित आहे. आम्ही तो सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ऑलिंपिक च्या इतिहासाकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर लक्षात येतं की आजपर्यंत भारताला एकूण 28 पदके या स्पर्धेमध्ये मिळाली आहेत. ज्यात 9 सुवर्ण, 7 रजत आणि 12 कांस्य पदके आहेत. यामध्ये ही फिल्ड हॉकी प्रकारात 8 पदके मिळाली आहेत. अमेरिका आणि रशिया हे सर्वाधिक पदके प्राप्त करणारे देश आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनुक्रमे 2520 आणि 1122 पदके मिळवली आहेत. या क्रीडा प्रकारात देशाचे योगदान वाढावे, त्याचा मान चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्याला मिळावा ही भावना मनात ठेऊन जिल्हा प्रशासन, आदिवासी विभाग मिळून “मिशन शक्ती” चे नियोजन करत आहे. मला विश्वास आहे, 2024 मधील ऑलंपिक स्पर्धेत पदक प्राप्त करणारा तरूण या निश्चितपणे या जिल्ह्याचा असेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नीती आयोगाने 2024 च्या ऑलिंपिक्स मध्ये किमान 50 पदके जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी नीती आयोगाने 20 मुद्यांचा कार्यक्रम ही निश्चित केला आहे. यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपक्रमांचा समावेश आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी “खेलो इंडिया” कार्यक्रमामध्ये प्राधान्य क्रीडा प्रकारांमधील प्रतिभासंपन्न खेळाडूंना 8 वर्षांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
खेलो इंडियाने जानेवारी ते फेब्रुवारी 2018 मध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये 17 वर्षांखालील एथलीटसनी 16 शाखांमध्ये सहभाग नोंदवला. हरियाणा राज्याने 38 सुवर्ण पदके मिळवत सुवर्ण पदकांच्या रांगेत पहिले स्थान मिळवले पण 36 सुवर्ण पदकांसह एकूण पदक संख्येत महाराष्ट्र देशात सर्वोच्च स्थानी राहिले. खेलो इंडियामध्ये देशभरातील 150 निवडक शाळा आणि 20 विद्यापीठांना चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
स्पोर्टस् ॲथोरिटी ऑफ इंडियाची दोन प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रात आहेत. एक आरसी-कांदिवली मुंबई येथे आहे तर दुसरे औरंगाबाद येथे. नागपूर मधील विदर्भ ऑलिंपिक असोसिएशन ही विदर्भ क्षेत्रात क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणारी संस्था आहे. येथे वेटलिफ्टींग, योग, लंगडी, मुष्टीयुद्ध, टग ऑफ वॉर, शॉर्ट बॉल, रोवलिंग, हॉलीबॉल यासारख्या खेळांना प्रोत्साहन दिले जाते. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती क्षेत्राचा समावेश आहे. राज्याला आणि देशाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करावयाचे असेल तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींमधील कौशल्ये विकसित करणे, या क्षेत्रात भरीव गुंतवणूक करणे अगत्याचे आहे. यादृष्टीनेही राज्य आणि केंद्र सरकार महत्वपूर्ण पाऊले टाकत आहे. मिशन शक्ती अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन भारतासाठी अधिकाधिक पदके मिळवण्यात या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग अधोरेखित व्हावा यादृष्टीने अतिशय नियोजनपूर्ण प्रयत्न या अभियानातून केले जातील, असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.