पणन महासंघाकडून जिल्ह्यात १० लाख क्विंटल कापसाची खरेदी

0

पणनचे संचालक संजय पवार यांची माहिती

जळगाव: लॉकडाऊनमुळे शेतकर्‍याच्या घरात पडून असलेल्या कापसाची पणन महासंघाकडून खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० लाख ९ हजार ५८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन महासंघाचे संचालक तथा जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पणन महासंघाचे संचालक तथा जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी माहिती देतांना पुढे सांगितले की, जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, मालेगाव आणि कासोदा येथे पणन महासंघातर्फे शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० लाख क्वींटल कापसाची खरेदी झाली असुन २ लाख ७ हजार ४५२ गाठी तयार आहेत. शेतकर्‍यांचा कापूस ५ हजार ३५५ या दराने खरेदी केला जात आहे. राज्यात पणन महासंघाची १५ लाख क्विंटल कापूस खरेदीची क्षमता आहे. तेवढेच पेमेंट शेतकर्‍यांना अदा करू शकतो. मात्र शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेता त्यांच्या हितासाठी ही कापूस खरेदी सुरूच ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पणन महासंघाने ८४ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यासाठी ३३०० कोटी रूपयांचे कर्ज घेतले असुन २५०० कोटीची हमी शासनाने घेतली आहे. उर्वरीत हमी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संचालक संजय पवार यांनी सांगितले

प्रत्येक घरातील कापूस खरेदी करणार

पणन महासंघातर्फे साधारणत: फेब्रुवारी, मार्च महिन्यात कापसाची खरेदी बंद होते. मात्र यंदा लॉकडाऊनचा फटका बसल्याने पणन महासंघाने प्रत्येक शेतकर्‍याच्या घरात असलेल्या कापसाच्या खरेदीचे नियोजन केले आहे. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरातील कापूस सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार असल्याचे संचालक संजय पवार यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी सहायक निबंधकांकडे सातबारा उतारा आणि अर्ज करावा असे आवाहनही त्यांनी केले.