आदर्शनगरात कामगार न्यायालयातील वकिलाचे घर फोडले: रोकड, दागिणे असा अडीच लाखांचा ऐवज लंपास
जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील मूळ गावी गेलेल्या वकिलाचे बंद घर चोरट्यांनी लक्ष करुन घरातून रोकड, दागिण्यांसह अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी आदर्शनगरात समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेले आहेत मूळ गावी
आदर्शनगर येथील उत्कर्ष हौसिंग सोसायटीमध्ये अॅड. आर.आर.पाटील हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. जिल्हा कामगार न्यायालयात ते वकील म्हणून काम पाहतात. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कोरोनामुळे अॅड. पाटील हे तीन महिन्यांपासून पत्नीसह त्यांच्या चोपडा तालुक्यातील खळगाव या मूळगावी गेलेले आहेत. अधूनमधून हे काही काम असले तरच जळगाव शहरात येत असतात.
वॉचमनमुळे चोरीचा प्रकार समोर
आदर्शनगरात एक वॉचमन आहे. तो दर महिन्याला 10 रुपये घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जात असतो. त्यानुसार हा वॉचमन गुरुवारी पैसे घेण्यासाठी उत्कर्ष हौसिंग सोसायटीमध्ये आला. याठिकाणी अॅड. पाटील यांचे घर उघडे होते. वॉचमनने आवाज दिला मात्र घरातून कुणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर वॉचनमच्या आवाजाने शेजारचे बाहेर आले. त्यांनी केलेल्या पाहणीत अॅड. पाटील यांचा घराच्या दरवाजा कोयंडा व कडी तुटलेली दिसली. घरात कपाटातील कपड्यांसह सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानुसार चोरीची खात्री झाल्यावर शेजारच्यांनी हा प्रकाराबाबत अॅड. पाटील यांना कळविले. अॅड. पाटील यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. दरम्यान घरातून दागिणे व काही रोकड असा अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याबाबत अॅड. पाटील यांनी बोलतांना सांगितले आहे.