बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथील रेल्वे ऊड्डाणपूल बांधकाम ठेकेदाराकडून सतत कामगार कायद्याचे उल्लंघण होत असल्याने शिवसेनेकडून रविवारी काम बंद पाडण्यात आले. कामगार कायद्याप्रमाणे साप्ताहिक सुट्टी कामगारांना देण्यात आली नसल्याने व कामगार कायद्याचे पालन व्हावे यासाठी शिवसेना नाडगाव-नांदगाव शाखेच्या शिवसैनिकांनी गौण खनिज वाहतूक होत असलेल्या ठिकाणावर डंपरच्या समोर दुचाकी आडव्या लावून काम बंद पाडले. दरम्यान, उड्डाणपूलावर काम करणार्या कर्मचार्यांकडे कुठल्याही प्रकराचे मास्क व सॅनिटायझर नसल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघण होत असल्याने तलाठी कल्पना पागृत यांनी पंचनामा केला.
नियमांचे उल्लंघण
उड्डाणपुल बांधकामासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी गौण खनिज वाहतूकीसाठी रॉयल्टी देण्यात आली आहे परंतु तहसीलदारांच्या आदेशपत्रात वाहतूक रविवारी बंदचे आदेश आहेत मात्र कंत्राटदाराकडून नियोजित खदानीतून ऊड्डाणपूल बांधकाम परीसरात गौण खनिजाचा साठा करण्यात आलेला आहे. याच साठ्यावरुन नेहमीप्रमाणे कामे सुरू असलेल्या ठिकाणी गौण खनिज वाहतूक सुरू आहे. याबाबत तहसीलदार बोदवड यांना हा प्रकार कळविण्यात आला असता त्यांनी गौण खनिज वाहतंकीचे काम खदानीवरून सुरू नसून ते उड्डाणपुलाच्या जवळून सुरू आहे व त्यांचे पिचिंगचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटदाराला हा पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप आता होत आहे.
नांदगाव तलाठ्यांनी केला पंचनामा
या ठिकाणी नांदगावच्या तलाठी यांनी रविवारी पाहणी करत सकाळत 11 वाजेच्या सुमारास पंचनामा केला. तहसीलदारांच्या आदेश पत्रात रविवारी गौण खनिज वाहतूकीला मज्जाव करण्यात आला असलातरी उड्डाणपूल परीसरात जेसीबीच्या सहाय्याने डंपरकरवी गौण खनिज वाहतूक सुरू असल्याचे आढळले. वाहन चालकांच्या तोंडाला मास्क लावला नसल्याचे तसेच सॅनिटायझरचा वापर होत नसल्याची बाबही समोर आली. तहसीलदारांच्या आदेश पत्रात नमूद वाहन क्रमांकाच्या व्यक्तीरिक्त अन्य वाहने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे तलाठ्यांच्या पंचनाम्यात नमूद आहे.
कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक
कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप असून कामगार कायदा धाब्यावर बसविला जात आहे. साप्ताहिक सुट्टी देणे गरजेचे असतांना रविवारी कामगारांकडून कामे करून घेतली जात आहे. कायद्यानूसार कामगारांना सकाळी चहा/अल्पोपहार व जेवण देणे गरजेचे आहे. सुसज्ज असे विश्रामगृह तसेच प्रसाधनगृहे चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे. कामगारांच्या प्रश्नी कामगार आयूक्त यांच्याकडे लेखी तक्रार शिवसेना नाडगाव शाखेकडून देण्यात येणार असून उड्डाणपूलाच्या कामाची गुणवत्ता तपासण्याकामी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. काम बंद करण्यावेळी युवासेनेचे तालुका समन्वयक अमोल व्यवहारे, अर्जून आसणे, गणेश राजपूत, संजय सोनवणे, सागर सुल्ताने, रवींद्र नखोद आदी उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी काम पूर्ववत सुरू करण्यात आले.