0

अवघ्या पाच रुपयात गरजूंची भागतेय भूक : तीन महिन्यात शिवभोजन केंद्राला प्रतिसाद

रावेर (शालिक महाजन) : शिवभोजन थाळी या राज्य सरकारची महत्वकांक्षी योजनेंतर्गत रावेर तालुक्यातील गरीब, बेसहारा, हातावर पोट असणार्‍या कुटुंबांतील सुमारे 18 हजार नागरीकांनी गेल्या तीन महिन्यात शिव थाळीचा लाभ घेतला आहे. राज्यातील कुणीही नागरीक उपाशीपोटी झोपता कामा नये या धोरणानुसार राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली आहे. दरम्यान, दररोज शंभर व्यक्तींना पोटभर जेवण देण्याची जबाबदारी येथील केंद्र प्रमुखांची असून अवघ्या पाच रुपयात जेवण मिळत असल्याने लाभार्थींमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

18 हजार लाभार्थींनी घेतला शिवथाळीचा लाभ
कोरोना काळात सुरू झालेली शिवभोजन केंद्र योजना रावेर व सावद्यात 1 मे पासुन सुरू झाली आहे. दोन्ही केंद्रावर आतापर्यंत 18 महिला, पुरूष, मुली-मुलांनी ताव मारला आहे. एका दिवसाला जास्तीत-जास्त शंभर नागरीकांनी शिवभोजनाची थाळीचा आस्वाद घेता येतो.

अवघ्या पाच रुपयात भाजी, वरण, भात, चपाती
अवघ्या पाच रुपयात दरोरोज 30 ग्राम वजनाची चपाती, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम वरण तर 150 ग्रॅम दर्जेदार भाजी देण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांची आहे तसेच जेवण दर्जेदार आहे किंवा नाही यासाठी अचानकपणे येथील पुरवठा अधिकारी हर्षल पाटील पाहणी करतात.

कोरोनाबाधीतांना 140 तर गरीबांना 30 रुपये अनुदान देते शासन
प्रत्येक लाभार्थीकडून पाच रुपये तर तीस रुपये अनुदान शासन असे 35 रुपये शिवभोजन केंद्र प्रमुखाना मिळतात. जेव्हा हेच शिवभोजन थाळी सोबत चहा, पोहा आणि एका केळासह कोविड सेंटरला पोहोचते. तेव्हा याची किंमत 145 रुपये होते. रावेर येथील शिवभोजन केंद्र प्रमुख म्हणाले की, गत महिन्यात तर एका दात्याने पाच रुपये प्रमाणे तब्बल पंधरा हजार देऊन महिनाभर फ्री जेवण पुरवण्याचे सांगितले होते, असे देखील लोक शिवथाळीला हातभार लावतात, असेही ते म्हणाले

गरीबांना जेवणाचे मिळते समाधान
कोरोना काळात सुरू झालेली शिवभोजन केंद्र अनेक गरीब व्यक्तीचे पोटभरत आहे. केंद्रावर स्वच्छता रहावी म्हणून मी स्वतःच बर्‍याच वेळा पाहणी करता. सावदा व रावेर दोघेही केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रावर येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला चवदार व स्वादिष्ट जेवण द्यावे तसेच गरीब ज्यांचे कुणीच नाही त्या व्यक्तीला केंद्रावर जेवण करतांना पाहून समाधान वाटत असल्याचे पुरवठा अधिकारी हर्षल पाटील म्हणाले.