जळगाव : मेहरुण तलावार फिरायला गेलेल्या साईनाथ शिवाजी गोपाळ (22, रा.समता नगर, जळगाव) हा हातपाय धुतांना पाय घसरुन पडल्याने तलावात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. कालपासून या तरुणाच्या मृतदेहाचा शोध लागलेला नाही. गुरुवारी दुपारपर्यंत मृतदेह सापडलेला नसून महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक तसेच पोलीसांकडून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
मित्रासोबत साईनाथ काल मेहरुण तलावावर फिरायला गेला होता. याठिकाणी तो पडल्यानंतर सोबतच्या मित्रांनी घरी कळविल्यावर प्रकार समोर आला. काल रात्री शोध घेण्यात आला. तसेच गुरुवारी सकाळपासून शोध घेण्यात येत आहे. मयत साईनाथ याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. कुटुंबिय मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवितात.