भाविकांसाठी आनंदवार्ता: उद्यापासून वैष्णोदेवी यात्रेला सुरुवात

0

रियासी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशातील सार्वजनिक धार्मिक तसेच पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. दरम्यान आता हळूहळू कमी गर्दीचे नियोजन करून पुन्हा धार्मिक स्थळे उघडण्यास सुरुवात होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्य़ातील त्रिकुट टेकडय़ांमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी तीर्थक्षेत्राची यात्रा देखील सुरु होणार आहे. उद्या सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या १८ मार्चला स्थगित करण्यात आली होती. यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ही यात्रा सोमवारपासून सुरू होईल आणि पहिल्या आठवडय़ात यात्रेकरूंची संख्या दररोज २ हजारांपर्यंत मर्यादित केली जाईल. यापैकी १९०० यात्रेकरू जम्मू- काश्मीरमधील आणि उर्वरित १०० बाहेरच्या राज्यांतील असतील अशी माहिती श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी दिली.

यात्रा नोंदणी खिडकीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी, केवळ ऑनलाइन माध्यमातून नोंदणी केल्यानंतर यात्रा करण्याची परवानगी दिली जाईल. या यात्रेकरूंना त्यांच्या मोबाइलवर आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. मुखपट्टी व चेहऱ्यावरील आच्छादन घालणे अनिवार्य राहणार असून, यात्रेच्या प्रवेशस्थळी येणाऱ्यांचे तापमान मोजण्यात येणार आहे. १० वर्षांखालील मुले, गर्भवती स्त्रिया, अनेक आजार असलेले लोक आणि ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक यांना यात्रा टाळण्याचा सल्ला देण्यात आले आहे.