मुख्यमंत्री पदाचा मास्क दूर करून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना उत्तर देईल: उद्धव ठाकरे

0

मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना रानौत प्रकरणात राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कंगना रानौत प्रकरणामुळे त्यात अधिक भर पडली. अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची पाकिस्तानशी तुलना केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने देखील कंगना रानौतची बाजू घेतली. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन साधले आहे. दरम्यान आज रविवारी त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

‘सध्या महाराष्ट्राची बदनामी सुरु आहे, मी शांत आहे, कोरोनाच्या काळात मला राजकारण करायचे नाही. याचा अर्थ महाराष्ट्राची बदनामी खपवून घेतली जाईल असे नाही. एकदा मुख्यमंत्री पदाचा तोंडावरील मास्क दूर करून सडेतोड उत्तर देईल’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रानौत आणि भाजपसह विरोधी पक्षाला दिला आहे.

अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केला. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यात वाकयुद्ध पेटले. मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्यामुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. मात्र कंगनाने महाराष्ट्राची बदनामी केली आहे. विरोधी पक्ष त्याचे समर्थन करत आहे, हे दुर्दैवी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती, आज अखेर त्यांनी यावर भाष्य केले.